मराठी विज्ञान परिषद (पुणे विभाग)

टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे 411030     ( -मेल: mavipa.pune@gmail.com,     दूरध्वनी क्र.‍:   9422048967 )

 

 

                                                                                                                                                              

 

नाडी निदान यंत्र

(सप्रयोग व्याख्यान)

 

व्याख्याते - श्री. वसंत क्षीरसागर

वेळ - संध्याकाळी ६ वाजता.

स्थळ - टिळक स्मारक मंदिर, चर्चा सभागृह, टिळक रस्ता पुणे ४११०३०

 

श्री वसंत क्षीरसागर यांनी आपल्या कल्पकतेतून आणि अनुभवातून हे नाडी निदान यंत्र घडविले आहे. नाडी निदान यंत्र नाडीचे ठोके आणि त्यात पडणारे बारीक बारीक फरकही संगणकाच्या पटलावर दाखवू शकते. रक्त वाहत असताना त्याच्या दाबात पडणारा फरक तसेच त्याचा आकारमानात पडणारा फरकही मापू शकते. एकाच वेळेला दोन्ही हातांचे नाडी परीक्षणही करू शकते. हाताशिवाय शरीराच्या अन्य भागात जिथे कुठे नाडी आहे तेथील रक्त प्रवाह, रक्तदाब ही तपासून देऊ शकते. याचे अनेक फायदे आहेत. आयुर्वेदात  नाडी परीक्षेला अतिशय महत्वाचे स्थान आहे. अनेक आयुर्वेदाचार्य नाडी परीक्षेवरून व्यक्तीच्या आरोग्याच्या स्थितीचे योग्य निदान करतात. ' चांगली नाडी सापडली' या मराठीतील वाकप्रचाराने नाडीचे महत्व अधोरेखित केलेले आहे. पूर्वीपेक्षा आता विविध प्रकारची मापने करण्याची यंत्रे अधिक आणि विकसित झालेली आहेत. वैद्यांनीही या यंत्रांचा उपयोग करून घेतल्यास अनेक वैद्यांची निदाने अधिक अचूक आणि वस्तुनिष्ठ येऊ शकतील. वैद्यांचे पारंपारिक ज्ञान आणि क्षीरसागर यांचे नाडी निदान यंत्र यांची सांगड बसली तर ते सर्वच समाजाच्या फायद्याचे ठरेल.

.....व्याख्यानासाठी सर्वांना आग्रहाचे निमंत्रण.....

 

(संजय भामरे, कार्यवाह, मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग)

 

 

विज्ञान रंजन स्पर्धा २०१२

 

- नियमावली -

 

--: ही स्पर्धा सर्वांसाठी खुली आहे.

--: प्रवेशमूल्य नाही.

--: खालील प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या मनाने, कोणालाही विचारून, पुस्तकात पाहून, प्रत्यक्ष प्रयोग करून मिळविता येतील

--: जास्तीत जास्त प्रश्नांची उत्तरे स्वत:च्या हस्ताक्षरात फुलस्केप कागदावर लिहून २० फेब्रुवारी २०१२ पर्यंत पुढील पत्त्यावर पाठवावीत-

 

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग. टिळक स्मारक मंदिर, टिळक रस्ता, पुणे ४१११०३०

 

--: उत्तम प्रयत्नांना आकर्षक बक्षिसे.

--: २८ फेब्रुवारी या राष्ट्रीय विज्ञान दिनी विजेत्यांची नावे महाराष्ट्र साहित्य परिषद, टिळक रस्ता, पुणे ३० येथील कार्यक्रमात जाहीर केली जातील

--: शिक्षण आणि वय लक्षात घेऊन स्पर्धकांना पुढील प्रमाणे पुढावा गुण देण्यात येतील.

      शिक्षण: पाचवीपर्यंत(१०), सातवीपर्यंत(९), दहावीपर्यंत(७), बारावीपर्यंत(५), पदवी(३) शास्त्रशाखा(०).

      वय वर्षे: १३ पर्यंत(६), १४ ते १६(४), १७ ते २०(२), ४१ ते ६०(२), ६१ ते ८०(४), ८१ हून जास्त (६)

--: आपल्या उत्तरपत्रिकेसोबत स्वतंत्र कागदावर पुढील माहिती लिहून पाठवावी-

    १. संपूर्ण नाव, २. पत्ता, ३. दूरध्वनी, ४. ई-मेल, ५. जन्मतारीख, ६. शिक्षण, ७. व्यवसाय, ८. पुढावा गुण.

--: परीक्षकांचा निर्णय अंतिम राहील.

--: अधिक माहितीसाठी वरील पत्त्यावर संपर्क करावा.

कार्यवाह, म. वि. प., पुणे - संजय भामरे  (९९२२५५२०४६),

कार्याध्यक्ष, म. वि. प. पुणे, विनय र. र., (९४२२०४८९६७),

ई-मेल mavipa.pune@gmail.com

 

 

प्रश्नावली

 

प्र. १ निरीक्षण करून उत्तरे लिहा . (गुण १० )

1. खेळातले कोणकोणते पत्ते उलट-सुलट वेगवेगळे दिसतात?

2. दहापेक्षा अधिक पाकळ्या असणारी फुले कोणती?

3. डावा दंड डाव्या कानावर ठेवून डाव्या पंजाने स्वत:चा उजवा कण पकडता येणे कोणत्या वयानंतर जमते?

4. पतंगाची उंची कन्नीच्या लांबीच्या किती पट असावी लागते?

5. तुमच्या घरातील गॅस सिलेंडरची उत्पादनाची तारीख कोणती? (ती कशी शोधली?)

6. नायलॉनचा धागा आणि लोकरीचा धागा बहिर्गोल भिंगातून बघितल्यावर कसे दिसतात त्याचे चित्र काढा.

7. गांडुळाच्या अंगावरील मोठे वळे त्याच्या तोंडापासून कितवे असते?

8. उकळत्या पाण्यात चहापत्ती घातल्यास उकळीत कोणता फरक पडतो?

9. वातकुक्कुटाची चोच कोणत्या दिशेला असते?

10. जीभ आणि भीज यातील ज चे दोन उच्चार दाखविणारे आणखी दोन शब्द लिहा.

 

प्र. २  थोडक्यात उत्तरे लिहा. (गुण  १० )

1. नैऋत्य मोसमी पावसापेक्षा ईशान्य मोसमी पाऊस जास्त पडणारे राज्य कोणते?

2. अग्निशमनासाठी वापरले जाणारे गुंडाळ-नळ कशापासून बनविलेले असतात?

3. पिठाच्या गिरणीसाठी किती दाबाची वीज लागते?

4. तळहाताला फुटणा-या घामात कोणते जंतुनाशक असते?

5. कृत्रिम उपग्रह पृथ्वीपासून किमान किती अंतरावर असावा लागतो?

6. फ्लेक्स बोर्डसाठी कोणते पॉलीमर वापरतात?

7. वनस्पतींना सिलिकॉनचा उपयोग काय?

8. घड्याळ्यात तास-मिनिट-सेकंद काट्यांमध्ये एक समान कोन असणा-या वेळा कोणत्या?

9. सध्या शनि कोणत्या नक्षत्रात दिसतो त्या नक्षत्राचे पुढच्या मागच्या नक्षत्रासह चित्र काढा.

10. रुबिकच्या ठोकळ्यावर किती रंगांचे किती चौरस असतात?

 

प्र. ३ चूक की बरोबर ते लिहा (चुकीचे असेल ते दुरुस्त करून लिहा) (गुण १० )

1. बांबूला त्याच्या आयुष्यात एकदाच फुले येतात.

2. कावळ्याला एकच डोळा असतो.

3. पृथ्वीवर इतर सर्व ग्रहांवरून येऊन उल्का पडतात.

4. एखाद्या दाट वस्तीत जितकी अधिक वातानुकूलन यंत्रे असतील तितकी तेथील हवा गरम होत जाते.

5. हवा बाहेर फेकणा-या पंख्यांची पाती लांब असतात.

6. विहिरीतून उपसून काढलेले पाणी हे एक खनिज आहे.

7. साळींदर नेम धरून आपले काटे फेकून मारते.

8. लहान मुलांना टप्पू मारल्याने त्यांना मोठेपणी मेंदुघाताचा विकार होऊ शकतो.

9. आपल्या शरीरातील लाल पेशी हा एक स्वतंत्र जीव आहे.

10. काटकोन त्रिकोणातल्या कोणत्याही दोन कोनांची बेरीज तिस-यापेक्षा जास्त असते.

 

प्र. ४ शास्त्रीय कारणे द्या (गुण २०)

1. फरसबंद खोलीसाठी फुलझाडू, सारवलेल्या अंगणासाठी केरसुणी तर रस्ता झाडण्यासाठी खराटा वापरतात.

2. हेडफोन कानाला लावून गाणी ऐकणा-यांना बहिरेपण लवकर येते.

3. एकाच जागी बराच वेळ उभे राहणा-या व्यक्तींनी बुटात बोटाच्या हालचाली केल्या पाहिजेत.

4. उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात लोक रंगीत कपडे वापरणे पसंद करतात.

5. हमरस्त्याच्या कडेला पिवळे-काळे पट्टे रंगविलेले असतात.

6. फोनवर हळू आवाजात बोलणे चांगले.

7. सतत एकच एक पीक काढल्यावर जमिनी नापीक होतात.

8. घनदाट अरण्यातील झाडे उंच वाढतात.

9. घराच्या आतल्या भिंती गुळगुळीत करतात तर बाहेरच्या खडबडीत करतात.

10. स्वच्छतेचा अतिरेक करणा-यांना पचनाचे रोग होण्याची शक्यता जास्त असते.

 

प्र. ५  सविस्तर उत्तरे लिहा.  (गुण ३०)

1. टोक, शेंडा, शिखर, कड, बाजू, धार या शब्दांचे नेमके अर्थ काय?

2. आपल्या पिण्याच्या पाण्यात क्षार आहेत का हे कसे तपासता येईल?

3. आगगाडीचा वेग आणि समुद्रातील जहाजाचा वेग मोजणे यात फरक काय?

4. माणूस वगळता प्राण्यांना गरजेच्या न वाटणा-या पाच महत्वाच्या गोष्टी कोणत्या?

5. गाईगुरांना चारणीला नेणे किंवा जागेवरच चार देणे यातील फायदे तोटे यांची तुलना करा.

6. आत्ये-मामे भावंडांमध्ये विवाह होऊन त्यांना अपत्य झाल्यास त्या अपत्यात त्याच्या सामायिक पणजीची किती टक्के जनुके असतील? आत्याच्या सासूच्या जनुकातील तसेच मामाच्या सास-याच्या जनुकातील किती टक्के जनुके अपत्यात असतील?

7. तुमच्या आसमंतात कोणकोणत्या प्रकारच्या लहरी आहेत याची यादी करा.

8. प्रत्येकी एक उदाहरण द्या - एकट्याने, जोडीने, कुटुंबाने, कळपाने, समूहाने राहणारे प्राणी.

9. बसचे इंजिन पुढे असणे सोयीस्कर की मागे? स्पष्ट करा.

10. टिव्हीवरून प्रक्षेपित होणारा कार्यक्रम कोणकोणत्या माध्यमांतून कोणकोणत्या स्वरुपात प्रवास करतो?

 

 प्र. ६ करून पहा, निरीक्षणे नोंदवा, निष्कर्ष लिहा . (गुण १५)

1. प्लास्टिकच्या पिशवीची जाडी कशी मोजाल? पिशवीची जाडी आणि पिशवीचा वापर यात काही संबंध आहे का? उदा. - दुधाची पिशवी, ओल्या कच-याची पिशवी इ.

2. २०१२ साली संकष्टी चतुर्थीचे चंद्रोदय आणि सूर्यास्त यांच्या वेळांचे आलेख काढा. त्यावरून ऋतुमानानुसार किंवा सूर्य- पृथ्वी मधील अंतर यानुसार पडणारा फरक कोणता?

३. २ लिटर क्षमतेचे एक पातेले घ्या. त्यात १ लिटर पाणी घाला. एक लाकडी पेन्सील घेऊन पातेल्याच्या काठावर दर ५ सेकंदाला एक असे टोले द्या. त्यामुळे पाण्याच्या पृष्ठभागावर कशा प्रकारचे  लाटा उठतात? दर चार / तीन / दोन / एक सेकंदाला टोले दिल्यावर पृष्ठभागावरच्या लाटा कशा प्रकारे बदलतात? 

 

प्र. ७ वैज्ञानिक वार्तापत्र लिहा  (गुण २०)

पाच मित्रांची पुनर्भेट - रान्चो, पिया, राजू, फरहान आणि चतुर हे पाच मित्र १ जानेवारी २००७ ला पृथ्वीवरून एकाच यानातून पृथ्वीच्या बाहेर निघाले. ते अनुक्रमे बुध, शुक्र, मंगळ, गुरु आणि शनि येथे पोचले आणि वस्ती करून राहिले. १ जानेवारी २०१२ ला ते पुन्हा पृथ्वीवर एकाच ठिकाणी परतले असे कल्पून त्यांची काल्पनिक मुलाखत घेऊन वैज्ञानिक वार्तापत्र तयार करा. ते तेथे पोचले कधी? तेथील किती दिवस, किती वर्षे ते तेथे राहिले? त्यांच्यावर तेथील गुरुत्वाकर्षण, प्रकाशमान, हवामान यांचा कोणता परिणाम झाला? इ. प्रश्नांची उत्तरे मिळवा.

 

 

 

नगररचना आणि पर्यावरणरक्षण - दोन्ही शक्य आहे...

मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि दि इंस्टीट्यूशन ऑफ इंजिनिअर्स, पुणे केंद्र यांचे संयुक्त विद्यमाने १६ ऑगस्ट २०११ रोजी "नगर रचना - समज गैरसमज" या विषयावर श्री. यशवंत कान्हेरे यांच्या खुळ्या मुलाखतीचा कार्यक्रम झाला. श्री. कान्हेरे नगर रचना विभागातील निवृत्त अधिकारी आहेत. श्री. विनय . ., डॉ. राजेंद्र सराफ, श्री. डी. जी. पाटील यांनी श्री. कान्हेरे यांची मुलाखत घेतली. या मुलाखतीचा सारांश पुढीलप्रमाणे-

 

मानवाने वस्ती करताना - पाणी तेथे वस्ती - हे सूत्र वापरले. प्राचीन काळापासून मानवी वस्त्या आणि संस्कृती नद्यांच्या काठाकाठाने विकसित होत गेल्या. पाण्याखेरीज अन्न, वस्त्र, निवारा या प्राथमिक गरजा पाण्याच्या वापरातून भागविणे शक्य होते. शेते, घरे, वस्त्या, गावे, नगरे, शहरे, महानगरे या टप्प्या टप्प्याने नगर रचना शास्त्र विकसित झाले.

 

आज आपण शहरी आणि ग्रामीण भाग अशी विभागणी करतो. पाच हजारावर लोकसंख्या, निम्म्याहून अधिक लोक शेती शिवाय अन्य उपजीविकेच्या साधनांवर म्हणजे उद्योगधंदे अथवा नोकऱ्या यांवर अवलंबून  राहून आपली उपजीविका करतात अशा लोकवस्तीला शहर म्हणतात. परंतु ही व्याख्या अपुरी आहे. त्यामुळे आज शहरी वस्ती वाढत आहे हा दावा फसवा आहे. आजचे शहरीकरण ही सूज आहे. शहराच्या व्याख्येत शाळा. दवाखाने, मैदाने, रस्ते, वाहतुकीच्या सोयी, वीज तसेच पाणी यांचा पुरेसा पुरवठा याही बाबी विचारात घेतल्या पाहिजेत.

 

माणूस, उपलब्ध जमीन आणि नैसर्गिक तसेच मानवनिर्मित साधनसंपत्ती यांचा समतोल साधने म्हणजे नगर रचना शास्त्र. हे शास्त्र ब्रिटीश अमदानीत कायदेबद्ध झाले. महाराष्ट्रात मुंबई आणि नागपूर या दोन शहरांमध्येच फक्त ब्रिटीश कालीन कायदे सुधारित केले गेले. ब्रिटीशांच्या पूर्वीही नगर रचना शास्त्र अस्तित्वात होते. कौटिल्याच्या अर्थशास्त्रात त्याचा उल्लेख आढळतो. राजा भोज, राजा जय्सिग यांच्या राजवटीतही ते दिसून येते. अगदी मोहन जो दारो मध्येही नगर रचना सुनियोजित पद्धतीने केलेली होती. पेशव्यांच्या कालखंडात पुणे शहराचा विकास करताना पाणी पुरवठ्याचे नियोजन केल्याचे पुरावे आहेत.

 

आधुनिक कालखंडात शहरांची वाढ करताना पुरेसे नियोजन करीत नाहीत. जल स्रोतांच्या नैसर्गिक मार्गांचा विचार करीत नाहीत.. जे काही तथा कथित नियोजन होते ते विविध कारणांनी कागदावरच राहते.

 

 

पं. नेहरू पंतप्रधान असताना ला कार्बुझीये यांना चंडीगड उभे करण्यासाठी त्यांनी आमंत्रित केले होते. या शहरात आजही टोलेजंग इमारती नाहीत. त्यामुळे तेव्हा आखणी केलेले रस्ते इ. सोयी आजही उपयोगी पडत आहेत. याउलट लावासाची स्थिती आहे. नदीच्या खोऱ्यामध्ये असणाऱ्या या गावाला गिरीस्थान म्हणणे हा मोठाच विनोद आहे. प्रचंड डोंगर उतार असतानाही तेथे नियम बदलून बांधकाम केले जात आहे.

 

नगर रचना आणि पर्यावरण एकमेकांच्या विरोधात नाहीत तर हातात हात घालून करणे शक्य आहे. मात्र त्यासाठी निसर्गातले उतार, जलसंधारण क्षमता, पाऊसमान इ. चा विचार करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष जागेवर न जाता पंख्याखाली किंवा एअर कंडीशन कचेरीत बसून कागदोपत्री नियोजन करणे अयोग्य आहे. मी स्वत: रायगड जिल्ह्याचे नियोजन करताना त्या त्या ठिकाणी स्थळ भेटी देऊन हे काम केले आहे. जास्त उताराच्या जागेचाही विचार होऊ शकतो तो तेथे झाड झाडोरा लावण्यासाठी घरे बांधण्यासाठी  नाही. कोकणातील नैसर्गिक दिघी बंदराची देखभाल नीट न केल्यामुळे जे एन पी टी या अनावश्यक बंदराची निर्मिती झाली. वसई ते अलिबाग पर्यंतच्या  किनाऱ्याला नियोजनाच्या अभावाची झळ आज पोचत आहे.

 

पानशेतच्या पुरानंतर पुणे शहराचा झालेला अनिर्बंध विस्तार अनियमितपणामुळे झाला. त्याचे परिणाम पुणेकर नागरिकांना तर भोगावेच लागतात पण मुळा-मुठेच्या काठावरील पुढील गाव-शहरांनाही भोगावे लागत आहेत. नदीच्या वरच्या अंगाला नगर वसविताना खूपच काळजी घेतली पाहिजे. 

 

 

कावळा व कोकीळा

(गौरी देशमुख)

 

  मराठी विज्ञान परिषदेच्या वतीने 15 जुलै रोजी झालेल्या कार्यक्रमामध्ये हौशी पक्षी निरिक्षक श्री. प्रकाश गर्दे यांचे 'कावळा व कोकीळा' या विषयावरील व्याख्यान अतिशय सुंदर व नाविन्यपूर्ण झाले. या विषयातील कुतुहलापोटी पेक्षकांची उपस्थिती लक्षणीय होती. मराठी विज्ञान परिषदेचे डॉ. विद्याधर बोरकर यांनी अध्यक्षस्थान भूषविले श्री. विनय र. र. यांनी प्रास्ताविक व वक्त्यांचा परिचय करून दिला. तर श्रीमती नीता शहा यांनी आभार मानले.

 

काकः कृष्णः पिकः कृष्णः को भेदो पिककायोः।

वसन्त समये प्राप्ते काकः काकः पिकः पिक॥

 

या सुभाषितामधून कावळा, कोकीळ यांच्यातील साधर्म्य व भेद सांगितला आहे. अनेक कवींच्या आवडीचा कोकीळ, कोकीळा यांचा उल्लेख कित्येक गीतातून झाला आहे. परंतु याही पलिकडे जाऊन श्री. प्रकाश गर्दे यांनी आपल्याच इमारती मधून सतत आढळ असणाऱ्या कावळा व कोकीळा यांच्यातील परस्परसंबंध, साहचर्य काळजीपूर्वक पक्षी निरीक्षणाच्या हौसेतून ध्वनिचित्रफितीत बंदीस्त केलेले क्षण आपल्या व्याख्यानाद्वारे प्रेक्षकांसमोर अतिशय सुसंबध्द पध्दतीने मांडले. गेल्या 7-8 वर्षापासून जोपासलेला छंद व त्याजोडीला त्याचा अभ्यास यातून त्यांची धडपड दिसून आली.

 

  कोकीळेला स्वतःचे असे घरटे नसते. कावळयाने बांधलेल्या घरटयाच्या शोधात ती असते. सतत ये-जा करून लक्ष ठेऊन कोकीळा कावळयाच्या या घरटयात अंडी घालते. कोकीळ-कोकीळा नंतर या अंडयाकडे फारसे लक्ष देताना दिसत नाहीत. त्यांच्या निरीक्षणानुसार, अंडी उबविणे, ऊनपावसापासून अंडयाचे रक्षण करणे मायेची ऊब या पिलांना देणे तसेच अन्न आणून पिल्लांना खाऊ घालण्यापर्यंत गोष्टींतून कावळयांमधे दिसणाऱ्या ममत्वाविषयीचे विवेचन त्यांनी केले. प्रस्थापित निरीक्षणांव्यतिरिक्त वैशिष्टयपूर्ण निरीक्षणे मांडून व्याख्यात्याने प्रेक्षकांना चकीत केले. अनेक ज्येष्ठ पक्षी तज्ज्ञांचे दाखले देत व स्वतः नोंदविलेली निरीक्षणे ध्वनिचित्र फितीद्वारे दाखवून प्रेक्षकांनाही त्यांनी हा आनंद दिला.

 

     कायम संपण्याच्या मार्गावर असलेल्या जीवजातींचा अभ्यास केला जातो तुलनेने, संख्येने जास्त असलेल्या व सभोवताली आढळणाऱ्या पक्ष्यांचा अभ्यास केल्यास त्यातूनही रोचक व नवीन माहिती मिळू शकते हे वक्त्यांनी आवर्जून सांगितले.

 

 

 

मधुमेह आणि जैविक रेणू अभ्यास

(अभिजित चव्हाण)

 

  मराठी विज्ञान परिषद, पुणे विभाग आणि इंस्टीटयूशन ऑफ इंजिनिअर्स, पुणे केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने 19 जुलै 2011 रोजी डॉ. विक्रम धोणे यांचे वरील विषयावर माहितीपूर्ण व्याख्यान झाले. डॉ. घोले हे पुणे विद्यापीठाच्या जीवरसायनशास्त्र विभागातून प्राध्यापक या पदावरुन निवृत्त झाले असून सध्या वसंतदादा पाटील साखर संशोधन केंद्राच्या पर्यावरणशास्त्र विभागाचे प्रमुख आहेत. त्यांचा परिचय डॉ. सराफ यांनी करून दिला. प्रा. पंडित यांनी डॉ. घोले यांचा सत्कार केला. प्रा. विनय र. र. यांनी आभार प्रदर्शन केले. सदर व्याख्यानाचा सारांश पुढीलप्रमाणे ः

 

  आपण जसजसे सुख सुविधांनी संपन्न जीवन जगू लागलो आहोत. त्या प्रमाणात काही व्याधी माणसात निर्माण होत आहेत. सध्याच्या धकाधकीच्या व गतिमान जीवनशैलीमुळे मधुमेह हा आपल्यातीलच एक अविभाज्य भाग होऊन गेला आहे. चेअर, कार आणि कमोड या तीन गोष्टींच्या वाढत्या वापराचा हा परिणाम आहे. अशिया खंडात गेल्या दशकात (2000-2010) मधुमेह असणाऱ्यांचे प्रमाण सर्वाधिक म्हणजे 51% ने वाढले आहे. मधुमेह हा आपल्या शरीरातील शर्करेच्या प्रमाणावर अवलंबून असतो. जर शरीरातील शर्करेचे प्रमाण कमी किंवा जास्त झाले तर माणसांच्या डोळयाच्या दृष्टी पटलाच्या संबंधीत, हृदयाच्या संबंधीत धोके संभवू शकतात. मधुमेहाचा धोका हा ग्लायकेशन प्रक्रिया, सॉरबिटॉल तयार होण्याची प्रक्रिया, जास्तीचा ताणतणाव या व अनेक कारणांमुळे संभवू शकतो.

 

  मधुमेह हा पूर्णपणे बरा करता येऊ शकत नाही. परंतु त्यास नियंत्रित ठेवणे सहज शक्य आहे. त्यासाठी जर आपण मधुमेहाबाबतच्या प्रक्रिया कशा कार्य करतात हे समजावून घेतले तर मधुमेहावर ताबा मिळवणे सहज शक्य आहे. आपल्या शरीरात असणाऱ्या प्रथिने व शर्करा यांचा संयोग होऊन एक नवीन पदार्थ तयार होतो त्यास शिफ्स बेस असे संबोधण्यात येते. त्याच्या निर्मितीमुळे प्रथिनांची गुंतागूंत, प्रथिनांच्या रचनेमधे बदल किंवा नवीन प्रथिनांची निर्मिती असे बदल होतात. तसेच यामुळे थकवा व शरीराची झीज असे प्रकार सुध्दा संभवतात. या सर्व प्रक्रियेस एजीई प्रक्रिया असे संबोधतात. त्यामुळे शरीराच्या कार्यावर खालील प्रमाणे बदल घडतात, जसे प्रथिनांना एकमेकांबरोबर जोडून राहण्याची क्षमता, त्याच्या आकारमानातील बदल. ग्लुकोज या शर्करेतील अल्डीहाईट या रासायनिक गटाची प्रथिनांमधील अमायनो या रासायनिक गटाशी रासायनिक अभिक्रिया होऊन एक जटील रेणू तयार होतो. त्यामुळे नंतर त्या रेणूतील ग्लुकोजमध्ये दोन कार्बोनिल गट तयार होतात. यांचा परिणाम म्हणून शरीराला मोठया प्रमाणात ऍंटीऑक्सिडण्टची गरज भासते. ऍंटीऑक्सिडण्टच्या अभावी शरीरातील पेशी विघटीत व्हायला लागतात व माणूस खंगू लागतो. रोग प्रतिकारक शक्ती कमी होते. जखमा लवकर बऱ्या होत नाहीत.

 

  शरीरात अन्नावाटे प्रवेश झालेल्या ग्लुकोजचे प्रमाण इन्शुलीन या वितंचकामुळे मर्यादित ठेवले जाते. रक्त व स्नायू वगळता शरीराच्या  अन्य भागात ग्लुकोज थेट पोचू शकत नाही. इन्शुलीन ग्लुकोज बरोबर एक अस्थिर संयुग तयार करते व शरीराच्या अन्य भागात ग्लुकोज पोहोचविते. ग्लुकोज शरीराच्या आवश्यकतेपेक्षा जास्ती असेल तर यकृतामध्ये तात्पुरती साठवली जाते. गरज पडल्यास इन्शुलीनच्या माध्यमातून शरीरात जाते.

 

  ग्लुकोजचे प्रमाण नियंत्रित ठेवणारे इन्शुलीन कमी पडले तर ग्लुकोज पेशीमध्ये जाते. पेशीमध्ये ग्लुकोजचे रुपांतर सॉर्बिटॉल मध्ये होते. सॉर्बिटॉलमुळे पेशीबाहेरील जल पेशीत येते व पेशी फुगतात. फुगलेल्या पेशींमुळे  रक्तवाहिन्या अरुंद होतात व त्यांना कठीणपणा येऊ लागतो. याची योग्य ती दखल वेळेत न घेतल्यास - रक्तदाब वाढतो तसेच मूत्रपिंडाचे व नेत्रपटलाचे विकार जडतात. दृष्टी अधू होत जाते.

 

  ग्लुकोजला नियंत्रित ठेवणारे इन्शुलीन कमी असेल तर ग्लुकोजची विविध प्रथिनांशी क्रिया होऊन प्रथिने निरुपयोगी होतात व त्याचा कचरा शरीरात वाढत जातो. शरीरात विषे भिनतात. त्याचा परिणाम मेंदूवरही होऊ शकतो. मधूमेह झालेल्यांमध्ये जेवणानंतर शरीरात जमणारे ग्लुकोज क्रियाविरहीत करण्याची यंत्रणा मंद झालेली असते. ग्लुकोज हे शरीराचे इंधन आहे. इंधनाचा भरणा शरीरात झाल्याने अतिऊरर््जा निर्माण होते.

 

  आयुवेदिक औषधींमध्ये वापरल्या जाणाऱ्या बेडकीचा पाला, मेथी इ. पदार्थांचा उपयोग मधुमेहावर होतो असे दिसून आले आहे. मात्र यावर अधिक संशोधन होण्याची गरज आहे.                           

 

 

(पहिल्या पानावर)